अलंकाराचे अनमोल लेणे :दागिने घालताना प्रत्येकाचं महत्व :सौ. विद्या फडके
सौभाग्यलक्ष्मीचा पहिला दागिना
म्हणजे कपाळीचा कुंकुम तिलक सूर्याच्या प्रभेप्रमाणे तो सतत तेजोमय
ठेवण्यासाठी मानसिक बळ ठेव व प्रयत्नशील रहा.
मंगळसूत्राचा पवित्र दागिना गळ्यात धारण करताना
सासरमाहेरच्या वाट्यात धार्मिकता व पावित्र्य यांची जपणूक कर. हातातील हिरवा चुडा
घालताना चुड्याप्रमाणे मन सदा प्रसन्न व बहरत ठेव.
नाकात नथ घालताना चेहऱ्यावरील आत्मविश्वास
टपोऱ्या मोत्याप्रमाणे तळपत ठेव. नथीप्रमाणे विनम्रता राख. > कानातील कर्णभूषणे तुला बजावत आहेत, हलक्या
कानाची होऊ नकोस.
बाजुबंद घालताना अभिमानाला बंद घाल.
हातातल्या गोठपाटल्या सांगताहेत, मनगट आमच्यासारखे बळकट कर.
तोड्याची खीळ लावताना रागाला खीळ घाल.
गळ्यातील चपलाहार सांगतोय, आळशी बनू नकोस. माझ्यासारखी चपल हो.
मोहनमाळ खुणावतेय, माझ्यासारखी सर्वांना आपल्या वागण्याने मोहिनी घाल.
चिंचपेटी बजावते, मला जपतेस तशी स्वरपेटीला जप. तिला तारसप्तक आवाज आवडत नाही.
अनामिकेतील अंगठी प्रथमपासून हुरहूर लावते व
खड्याचे तेज समोरील भाग्य चमकवून टाकते. अंगठीप्रमाणे बोटात कला खेळव व सर्वांना
प्रिय हो.
कमरपट्टा बजावतो आहे, अवखळ मनाला बांध घाल. कमर कसून सर्वांना कामाने सामवून घे.
मेखलेतील - छल्ल्यातील चावी आवाज करून सांगतेय
जबाबदारी नीट संभाळ,पेल.
पायातील साखळ्या निनादत आहेत, तुझ्या वागणुकीने या निनादाप्रमाणे सर्वांच्या मनात निनादत रहा.
जोडवी - सर्व देहाचा उंबरठा ! जोडव्याचा आवाज
सांगत आहे, आपला पाय कधीही वाकडा पडू देऊ नको.
डोईवरच्या पदराचा शेव, शेला सांगत आहे, माझे स्थान अढळ आहे. तुझे
पातिव्रत्य, धार्मिकता ही पैठणीसारखी सळसळत ठेव व पदराचे
पावित्र्य राख.
केसातील गजरा कानाशी गुंजारव करत सांगत आहे.
माझ्या सुगंधासारख्या तुझ्या गुणांचा परिमल सर्वत्र दरवळत ठेव. ओठावर सतत सायली
पुष्पांचं हसू ठेव. हे दागिने घालताना प्रत्येकाचं महत्व समजावून घे व भावी
आयुष्यात 'प्रियदर्शिनी ' हो. :
No comments:
Post a Comment